अहमदनगरचा 533 वा वर्धापन दिन: जाणून घ्या अहमदनगर ची ऐतिहासिक पार्श्वभूमी!
जगाच्या इतिहासात ठराविकच शहरे आहेत कि; त्या शहरांचा स्थापना दिन किंवा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. अहमदनगर या शहराचा सुद्धा स्थापना दिन साजरा करण्यात येतो. कारण या शहराला व संपूर्ण जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, अहमदनगर ची वैशिष्ट्ये काय आहेत जाणून घेऊया.
प्राचीन ऐतिहासिक अहमदनगर शहराविषयी माहिती.
पूर्वी एकेकाळी अहमदनगरची तुलना कैरो आणि बगदाद सारख्या शहरांसोबत व्हायची. हे खरं आहे; तत्कालीन सर्वात समृद्ध शहर म्हणजे अहमदनगर समजल होतं.
प्राचीन ऐतिहासिक वैभवशाली इतिहास असलेल्या अहमदनगर शहराचा 28 मे 2023 हा दिवस 533 वा स्थापना दिवस म्हणजेच वर्धापन दिन आहे. तो दरवर्षी साजरा केला जातो.
काना,मात्रा, वेलांटी,उकार, अनुस्वार,अर्ध-चन्द्र ह्यापैकी काहीही नसलेलं अशा अगदी सरळ माणसांचे सरळ शहर म्हणजे अहमदनगर. या शहरात सर्वच जातीधर्माचे लोक एकत्र राहतात.
अहमदनगरच्या भुमीला एक विशेष अशी सोनेरी ऐतिहासिक चौकट लाभलेली आहे. भुईकोट किल्ला,फराह- बाग महाल, चांदबीबीचा महाल नावाने ओळखली जाणारी सलाबत खानाची कबर, हत्ती बारव, बागरोझा,आलमगिर, खर्ड्या चा किल्ला, बेहस्तबाग महाल,दमडी मशिद, पारनेरचा विशाल वटवृक्ष,नगरचे प्राचीन अष्टविनायक, "आशिया खंडातील एकमेव रणगाडा संग्रहालय" तसेच या शिवाय इंदोर संस्थान अधिपती "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर" यांचे माहेर-जन्म स्थळ असलेले चौँडी ग्राम सुद्धा अ.नगर मधील जामखेड तालुक्यात आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे वैशिष्टे :
अहमदनगर आज महाराष्ट्रातला सर्वात मोठ्ठा जिल्हा म्हणून अहमदनगरचा उल्लेख करण्यात येतो. महाराष्ट्रा मधली पहिली मानवी वसाहत याच नगर जिल्ह्यात होती. प्रवरा नदी काठी दायमाबाद आणि नेवासे येथील उत्खननातून या जोर्वे संस्कृतीचा शोध लागला. महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा हा सर्वात प्राचीन ठेवा समजला जातो.
इस पूर्व 900 ते 300 या दरम्यान इथे आंधभृत्य,इस 400 पर्यन्त राष्ट्रकुट चालुक्य, 1170 ते 1310 देवगिरीचे यादव, पंधराशेव्या शतकात बहामनी, बहामनीतून बाहेर पडलेल्या मलिक अहमदशहा बहिरी यांची सत्ता या भागात होती. मलिक अहमदशहा बहिरी यांनी सीना नदी काठी नगर शहराची स्थापना केल्याची सांगण्यात येत.
अहमदशहाचे नावावरूनच या शहराचं नाव अहमदनगर अस करण्यात आलं असे सांगण्यात येते. निझामशाही नंतर मराठेशाही आणि त्यानंतर मुघल शाहीची सत्ता या परिसरात होती. त्या नंतरच्या काळात म्हणजे 1759 मध्ये इथे मराठ्यांचा म्हणजे पेशव्यांचा अंमल सुरू झाला.1803 मध्ये नगर इंग्रजांच्या ताब्यात गेलं. त्यानंतर 1822 साली इंग्रजांनी अहमदनगर जिल्हा जन्माला घातला.
इथे मलिक अहमदशहा बहिरी यांच्या सोबत आंध्र प्रदेशातून आलेला पद्मशाली समाज आहे, राजस्थानातून आलेला तांब्याची भांडी बनवणारा समाज आहे,तसेच ब्रिटीशां सोबत व्यापार करण्यास आलेला पारशी आणि मारवाडी समाज देखील आहे.
अहमदनगर जिल्ह्यात लिहण्यात आलेली ग्रंथ संपदा:
इथल्या मातीत तयार झालेली ग्रंथ संपदा पाहिलीत तरी नगरच्या मातीत काहीही उगवून येवू शकते यावरचा विश्वास दृढ होत जातो. अहमदनगर जिल्ह्यात ज्ञानेश्वरी लिहण्यात आली. ज्ञानेश्वरांनी नेवासे येथील मुक्कामात ज्ञानेश्वरी रचली,चक्रधर स्वामींनी इथेच लीळा चरित्र लिहला.
पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया आणि सी.पी. घोष यांनी "हिस्ट्री ऑफ एन्शन्ट इंडियन सिव्हिलायझेशन" तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी "थॉटस् ऑन पाकिस्तान",आणि मौलाना आझादांनी "गुबार-ए-खातिर" असे ग्रंथ याच नगर जिल्ह्या मध्ये लिहण्यात आलेत.
अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध स्थळे:
शिर्डीचे साईबाबा, शनी शिंगणापुर ही तर नगर जिल्ह्यातली सर्वाधिक गर्दी असणारी ठिकाणं. याच शिवाय देवगड भगवानगड, सराला, साकुरीचे आश्रम, अवतार मेहरबाबा, महानुभव पंथीयाचं डोमेग्राम,नेवासे या सारखी अनेक विविध धार्मिक आणि आध्यात्मिक ठिकाणे आहेत.
नगरचं रणगाडा संग्रहालय आशिया खंडातलं एकमेव संग्रहालय असून इंग्लंड, अमेरिका, रशिया, जर्मनी, फ्रान्स, इ. देशांनी युद्धात वापरलेले ४० हून अधिक रणगाडे सर्वात जूना 1917 चा रोल्स राईस रणगाडा या संग्रहालया मधे आहे.
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" ही ऐतिहासिक घोषणा लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी दिली ती देखील नगर मध्ये केली होती.
देशातील पहिली महिला शासक रजिया सुलतान दिल्लीची तर चांद बिबी ही अहमदनगरच्या निजामाची कन्या. देशातील दुसरी महिला शासक (1550 ते सन 1599) तिने मुघल शासक अकबरा विरुद्ध निकराचा लढा दिला, तिची कबर नगर पाथर्डी रस्त्यावर मदडगाव- टाकळी काझी नजीक आहे.
अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असणारा जिल्हा समजला जातो. कारण या जिल्ह्यात सर्वात जास्त उस लागवडीखालील क्षेत्र आहे.
असे अनेक वेगवेगळे वैशिष्ट्ये असणारा हा अहमदनगर जिल्हा समजला जातो.
( वरील लेख हा शैक्षणिक हेतू डोळ्यासमोर ठेऊन इंटरनेट व उपलब्ध माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे.)
Join : Whats App Channel